बऱ्याच जणांचा असा समज असतो, की लग्नामध्ये खूप जबाबदाऱ्या असतात, "लिव्ह-इन' नात्यात जबाबदारीशिवाय गंमत असते, हे अगदी असत्य आहे. ज्या नात्यात भावनिक गुंतवणूक असते, अशा कुठल्याही परिपक्व नात्यात खूप जबाबदाऱ्या असतातच. त्यामुळे त्या नात्यांच्या तुटण्याचा त्रासही तितकाच जीवघेणा असतो.
आनंदात सहभागी होण्यासाठी एकमेकांची ध्येय जाणून घेणं आवश्यक आहे. एकमेकांच्या महत्त्वाकांक्षा माहिती करून घेणं आणि ज्याच्या त्याच्या महत्त्वाकांक्षेच्या प्रवासात साथ देणं हा आनंदपूर्तीचा एक सुंदर मार्ग आहे.
माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला बदलायला अवघड असा गाभा कोणता आणि परिस्थितिजन्य भाग कोणता यातला भेद समजायला हवा. हा फरक समजला नाही तर सहजीवनात अनेक ताणताणाव निर्माण होऊ शकतात. माणसात चांगले बदल होऊ शकतात यावर माणसाचा ठाम विश्वास असायला हवा. कोणताही माणूस संपूर्णपणे चांगला किंवा संपूर्णपणे वाईट असा नसतो, तर पांढऱ्यापासून काळ्यापर्यंतच्या अनेक रंगछटांनी बनलेला असतो, या गोष्टींवर ठाम विश्वास ठेवायला हवा...